सांगोल्यात शुभदिपावली सुरमयी पहाटेत संगीत स्वरांचा दरवळ – रसिक मंत्रमुग्ध
सांगोल्यात शुभदिपावली सुरमयी पहाटेत संगीत स्वरांचा दरवळ – रसिक मंत्रमुग्ध

सांगोल्यात शुभदिपावली सुरमयी पहाटेत संगीत स्वरांचा दरवळ – रसिक मंत्रमुग्ध
सांगोला, – दिपावलीच्या पहिल्या अभ्यंगस्नानाच्या मंगलप्रसंगी नरक चतुर्दशी. निमीत्त सोमवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता महादेव गल्ली येथील श्री दत्त मंदिरात “शुभदिपावली सुरमयी पहाट” या बहारदार संगीत मैफिलीने सांगोल्याची पहाट स्वरमयी केली. या कार्यक्रमाने शहरात भक्तीभाव, सुरांचा दरवळ आणि आनंदाचा माहोल निर्माण झाला.
नव्या ओढीचा, नव्या गोडीचा भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत, गोंधळगीत अशा विविध संगीत प्रकारांनी सजलेल्या या मैफिलीत उपस्थित रसिक श्रोते सुरांच्या माधुर्यात रमून गेले. गायक श्री. दयानंद बनकर (संगीत विशारद), श्री. अतुल उकळेसर यांनी आपल्या गोड आवाजात गीतांचे मनोहारी सादरीकरण केले. त्यांना पखवाजावर श्री. चैतन्य झाडे आणि तबल्यावर श्री. रणजीत सुतार यांनी उत्कृष्ट साथ दिली. निवेदन आणि सूत्रसंचालन श्री. सुधीर गायकवाड यांनी प्रभावीपणे केले.
या कार्यक्रमात डॉ. प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, कुमारी वैष्णवी बनकर,श्री.प्रसाद भाकरे, चंद्रकांत लिंगे, श्री सचिन ढोले सर, श्री भैरवनाथ गोडसे, श्री गणेश भंडारे तसेच सर्व बाल कलावंत चमूनेही आपला सुरेल सहभाग नोंदवला. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक . सोमेश यावलकर, नगरसेवक न.पा. सांगोला यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
कार्यक्रमानंतर श्री दत्त मंदिर समिती तर्फे सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रा. राजेंद्र ठोंबरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत तो दरवर्षी नियमितपणे घेण्याची विनंती व्यक्त केली. कार्यक्रमाचे अनुमोदन व आभार प्रदर्शन ह.भ.प. सुभाष लवूळकर महाराज यांनी केले.
रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण दत्त मंदिर परिसरात स्वर, भक्ती आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या सुरमयी दिपावली पहाटेने सांगोल्याच्या सांस्कृतिक जीवनात एक अविस्मरणीय अध्याय कोरला गेला.

