भारत मातेचे थोर सुपुत्र ; लाल बहादूर शास्त्री
भारत मातेचे थोर सुपुत्र ; लाल बहादूर शास्त्री

भारत मातेचे थोर सुपुत्र ; लाल बहादूर शास्त्री
भारत मातेचे थोर सुपुत्र, देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती आहे. लालबहादूर शास्त्री यांचे पूर्ण नाव लालबहादूर शारदाप्रसाद वर्मा असे होते. पण १९२५ साली बनारस येथील काशी विद्यापीठाची शास्त्री ही पदवी लालबहादूर यांनी मिळवली त्यामुळे त्यांना सर्वजण शास्त्री म्हणू लागले पुढे त्यांनी आपल्या नावापुढे शास्त्री हेच नाव लावले आणि ते लालबहादूर वर्माचे लालबहादूर शास्त्री बनले. त्यांचा जन्म २ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील मोगल सराई या गावात झाला. लालबहादूर शास्त्री दीड वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आईनेच त्यांचा सांभाळ केला. लालबहादूर शास्त्री यांचे बालपण गरिबीतच गेले. घरची हलाखीची परिस्थिती असूनही लालबहादूर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शालेय वयातच लाला लजपतरायांनी स्थापन केलेल्या द सर्व्हन्ट ऑफ द पीपल सोसायटीचे सदस्यत्व त्यांनी घेतले. महात्मा गांधींच्या विचाराने ते प्रभावित झाले होते. गांधीजींच्या असहकार चळवळीत त्यांनी भाग घेतला. गांधीजींसोबत दांडी यात्रेतही त्यांनी भाग घेतला होता. १९३९ साली त्यांची पंडित नेहरूंशी भेट झाली आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. देश स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरुंच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे व वाहतूक, दळणवळण, वाणिज्य व उद्योग आणि गृहमंत्रीपद भूषविले. ते रेल्वेमंत्री असताना एकदा रेल्वेचा अपघात झाला होता त्यात काही प्रवाशांना स्वतःचा जीव गमवावा लागला होता या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. देश आणि संसदेने त्यांच्या या अभूतपूर्व निर्णयाची प्रशंसा केली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनीही त्यांच्या या इनामदार वृत्ती आणि आदर्श मूल्यांची संसदेत प्रशंसा केली होती. पंडित नेहरुंच्या आकस्मिक निधनानंतर देशाची धुरा त्यांच्याकडे आली. ९ जानेवारी १९६४ रोजी देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी आपल्या कर्तुत्ववाने पंतप्रधानपदावर ठसा उमटविला. प्रखर राष्ट्रवादी असलेल्या शास्त्रीजींनी आपल्या पंतप्रधान कालावधीत देशहिताचे अनेक निर्णय घेतले. १९६५ साली पाकिस्तानने आगळीक करुन भारताशी युद्ध पुकारले. पण देशात लालबहादूर शास्त्री यांच्यासारखे खंबीर नेतृत्व असल्याने पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. आपल्या कणखर नेतृत्वाने त्यांनी पाकिस्तानला पराभूत केले. या युद्धानंतर त्यांच्या नेतृत्वाने जगातील मातब्बर नेते प्रभावित झाले. जय जवान, जय किसान या त्यांच्या मंत्राने देश भारावून गेला. लालबहादूर शास्त्री हे अवघे १९ महिने पंतप्रधान होते. या १९ महिन्यांच्या कालावधीत जनसामान्यांच्या हृदयात त्यांनी अढळ स्थान मिळवले. ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांचे निधन झाले. जयंतीदिनी शास्त्रीजींना विनम्र अभिवादन!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
