शैक्षणिक
एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात भ्रष्टाचाराविरुद्ध शपथ

एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात भ्रष्टाचाराविरुद्ध शपथ

सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केगाव येथील एन.बी.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी “सतर्कता जनजागृती सप्ताह” उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त “जागरूक नागरिक – भ्रष्टाचारमुक्त भारत” या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या नेतृत्वाखाली आणि प्राचार्य डॉ. एस. डी. नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. माणिक टी. शिंदे (NSS कार्यक्रम अधिकारी), ओंकार सुरवसे (NSS समन्वयक) आणि चेतन मेहत्रे (NSS समन्वयक) यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र माने (IITM प्रमुख) आणि प्रा. एस. एच. क्षीरसागर उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. नवले यांनी विद्यार्थ्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध सतर्क राहण्याचे आवाहन केले. “भ्रष्टाचार नको – प्रामाणिकता हाच मार्ग” या संदेशासह त्यांनी सर्वांना भ्रष्टाचारविरोधी शपथ दिली. शपथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “मी कधीही लाच देणार नाही किंवा घेणार नाही, प्रामाणिकतेने कार्य करून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देईन” अशी प्रतिज्ञा केली.
या प्रसंगी महाविद्यालयात भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि देशाच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. प्राचार्य डॉ. नवले यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून दोन्ही महान नेत्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांनी सांगितले की सरदार पटेल यांनी देशाच्या एकात्मता आणि प्रशासनिक सुदृढतेसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे, तर श्रीमती इंदिरा गांधी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे देशाच्या प्रगतीला नवीन दिशा मिळाली.आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, प्रामाणिकता आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचे पालन करण्याचे तसेच जबाबदार नागरिक म्हणून समाजसेवेत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन व देखरेख डॉ. एस. एच. शिरसगार मॅडम यांनी केली. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी केले, तर आभार प्रदर्शन ओंकार सुरवसे यांनी केले.देशभक्ती, प्रामाणिकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत NBNSCOE परिवाराने या दिवशी दोन्ही महान नेत्यांना अभिवादन केले आणि “भ्रष्टाचारमुक्त भारत” घडविण्याचा निर्धार व्यक्त केला



