राजकीयसुपरफास्ट विशेष

सांगोला नगरपालिका निकाल:आनंदा माने नूतन नगराध्यक्ष 

हद्दवाढ भागातील समस्यांचे डोंगर पार करण्याचे मोठे आव्हान

सांगोला नगरपालिका निकाल:आनंदा माने नूतन नगराध्यक्ष 

हद्दवाढ भागातील समस्यांचे डोंगर पार करण्याचे मोठे आव्हान

सांगोला विशेष प्रतिनिधी(प्रा.राजेंद्र ठोंबरे)

सांगोला नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, नूतन नगराध्यक्ष म्हणून आनंदा माने विजयी झाले आहेत. २३ पैकी १५ नगरसेवक निवडून आणून शहाजी बापू नी बहुमत मिळवले असले, तरी विजयाचा गुलाल शांत झाल्यावर आता नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या प्रचारात अनेक विषयांवर केवळ वरवरची चर्चा झाली असली, तरी शहराच्या विस्तारित भागातील समस्यांवर अद्याप कोणाकडूनही ठोस भाष्य किंवा कृती आराखडा मांडला गेलेला नाही.

विस्तारित शहराकडे दुर्लक्ष: नागरिकांच्या तीव्र भावना

सांगोला शहराची हद्द वाढली असली, तरी या हद्दवाढ भागात सुविधांचा मात्र दुष्काळ आहे. शहराच्या मुख्य भागाच्या तुलनेत विस्तारित वस्त्यांमध्ये रस्ते, गटारी आणि दिवाबत्तीची प्रचंड कमतरता आहे. “शहराबाहेरून जाणारे महामार्ग जसे सुसज्ज आहेत, तसेच दर्जाचे रस्ते शहराच्या अंतर्गत भागात का नाहीत?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या भागातील रस्ते चिखलमय झाले असून रात्रीच्या वेळी पथदिव्यांअभावी अंधाराचे साम्राज्य असते.

प्रलंबित कामे आणि भुयारी गटार योजनेचा प्रश्न

शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटार योजनेची कामे अर्धवट पडलेली आहेत. ही कामे अर्धवट असल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. नूतन सत्ताधारी मंडळाने कोणतीही नवीन आश्वासने देण्यापेक्षा, ही रखडलेली आणि अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी जनतेची आग्रही मागणी आहे.प्रचंड धूळ व मोकाट जनावरांचा प्रश्न देखील ऐरणीवर आहे.

गटारींना हवे प्राधान्य

शहराच्या आरोग्यासाठी सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारींचे जाळे असणे आवश्यक आहे. अनेक प्रभागांत उघड्या गटारींमुळे दुर्गंधी आणि आजारांचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यांच्या कामांसोबतच ‘गटारींना प्राधान्य’ देऊन शहराचे आरोग्य सुधारावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आरक्षित जागा आणि उद्यानांची गरज

सांगोला शहरात प्रशासकीय पातळीवर उद्यानांसाठी अनेक जागा आरक्षित आहेत. मात्र, या आरक्षित जागा विकसित करण्याबाबत सत्ताधारी किंवा विरोधकांकडून अद्याप कोणतेही स्पष्ट आश्वासन देण्यात आलेले नाही. वाढत्या शहरीकरणामुळे मोकळ्या हवेसाठी उद्यानांची आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘नाना-नानी पार्क’ची नितांत गरज आहे. या आरक्षित जागांवर उद्याने उभारून शहराचे सुशोभीकरण करणे हे नवीन नगराध्यक्षांसमोर मोठे आव्हान असेल.

नूतन मंडळाकडून कृतीची अपेक्षा

माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटाचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. “सत्ता मिळवणे सोपे आहे, पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण,” याची जाणीव आता नूतन मंडळाला ठेवावी लागेल. प्रचारादरम्यान या गंभीर मुद्द्यांवर फारसे भाष्य झाले नसले, तरी आता प्रत्यक्ष कामातून या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी सांगोल्यातील जनतेची रास्त अपेक्षा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button