सामाजिक

सांगोल्यातील वृत्तपत्रांच्या योगदानामुळेच मी साहित्यिक होऊ शकलो – प्रा. राजेंद्र ठोंबरे

सांगोल्यातील वृत्तपत्रांच्या योगदानामुळेच मी साहित्यिक होऊ शकलो - प्रा. राजेंद्र ठोंबरे

सांगोल्यातील वृत्तपत्रांच्या योगदानामुळेच मी साहित्यिक होऊ शकलो – प्रा. राजेंद्र ठोंबरे

सांगोला: “माझ्या विद्यार्थी दशेपासून असलेल्या लेखनाच्या आवडीला सांगोल्यातील वृत्तपत्रांनी खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून दिले. पत्रकारितेतील २५ वर्षांच्या प्रवासात इथल्या स्थानिक साप्ताहिकांनी आणि दैनिकांनी दिलेल्या पाठबळामुळेच माझी लेखणी बहरली आणि आज मी साहित्यिक म्हणून उभा राहू शकलो,” असे कृतज्ञतापूर्वक प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार प्रा. राजेंद्र ठोंबरे यांनी केले.

‘सांगोला चौफेर’ वृत्तपत्राच्या वतीने आयोजित विशेष गौरव सोहळा ‘सांगोला चौफेर’च्या कार्यालयात संपन्न झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘सांगोला चौफेर’चे संपादक जगन्नाथ साठे यांच्या हस्ते प्रा. ठोंबरे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत कविवर्य महादेव कांबळे यांनी केले.

या सोहळ्याला सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब वाघमारे, भीमाशंकर पैलवान, नारायण विसापूरे, अमर गुळमिरे, सुधाकर म्हेत्रे, जिज्ञासा साठे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रा. ठोंबरे यांनी आपल्या लेखन प्रवासाच्या स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले की, “मी जरी विज्ञान शाखेचा पदवीधर असलो तरी मला वाचन आणि साहित्याची ओढ सुरुवातीपासूनच होती. १९७० च्या दशकात मारुती साधू माळी यांच्या ‘सांगोला टाइम्स’ या साप्ताहिकातून माझ्या लेखनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर बार्शी येथे बी.एड. करत असताना कर्मवीर जगदाळे मामा यांच्या कॉलेजच्या गौरवग्रंथात सहाय्यक संपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.”

“१९८८ पासून सांगोल्यात शैक्षणिक सेवा सुरू केल्यानंतर त्याकाळी नागेश जोशी, मोहन मस्के, मारुती सोनवणे यांची साप्ताहिके लोकप्रिय होती. २००२ मध्ये जेव्हा मोहन मस्के यांनी ‘दैनिक माणदूत एक्स्प्रेस’ सुरू केले, तेव्हापासून बातम्या, स्तंभ आणि प्रासंगिक लेखनाला मोठी गती मिळाली. आज सांगोल्यात अनेक दैनिके सुरू आहेत आणि या सर्व माध्यमांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.”

“डॉ. कृष्णा इंगोले आणि प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनामुळे ‘विद्यामंदिरचे पुजारी’ हे माझे पहिले पुस्तक साकार झाले. शिक्षक, वार्ताहर, पत्रकार ते साहित्यिक या माझ्या संपूर्ण प्रवासात सांगोल्यातील वृत्तपत्रांचे योगदान सिंहाचा वाटा असलेले आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. ठोंबरे यांनी ‘सांगोला चौफेर’ने केलेल्या गौरवाबद्दल आभार मानले आणि वृत्तपत्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button