उन्मेष सृजनरंग २०२५” युवा महोत्सवाचे सांगोल्यात उत्साहात उदघाटन
लोक कलाकार व लोककला अभ्यासक योगेश चिकटगावकर यांचे हस्ते उदघाटन,कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी

उन्मेष सृजनरंग २०२५” युवा महोत्सवाचे सांगोल्यात उत्साहात उदघाटन

लोक कलाकार व लोककला अभ्यासक योगेश चिकटगावकर यांचे हस्ते उदघाटन,कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी
सांगोला /प्रतिनिधी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग व सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सांगोला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ वा विद्यापीठ स्तरीय युवा महोत्सव “उन्मेष सृजनरंगचा २०२५” याचा भव्य उदघाटन सोहळा सांगोला महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रसंगी सुप्रसिद्ध लोककलाकार व लोककला अभ्यासक मा. योगेश चिकटगावकर यांनी उदघाटक म्हणून उपस्थित राहून पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उदघाटऩ केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी भूषविले.
यानंतर उदघाटक म्हणून बोलताना योगेश चिकटगावकर यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला की, “लोककला, संस्कृती आणि सृजनशीलतेतून समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळते. युवकांनी आपल्या कलागुणांद्वारे भारतीय परंपरेचा संदेश जगभर पोहोचवावा.”
लोकसंस्कृती, स्त्रीशक्ती आणि सामाजिक समतेवर भाष्य करताना त्यांनी भावनिक शैलीत सांगितले“हजार मुलांमागे दीडशे मुली कमी आहेत, कारण आपण त्या मुलींना जन्म घेऊ देत नाही. तीच मुलगी आई, बहीण, माय माऊली असते तिच्यामुळेच घर उजळते.”“प्रत्येक घरातून एक शिवबा, एक सावित्री जन्माला यावी,” असे आवाहन करत त्यांनी जिजाऊ, सावित्रीबाई आणि रमाई यांच्या त्यागमय जीवनाचे स्मरण केले.

शिवचरित्र आणि लोककला यांची सांगड घालत चिकटगावकर यांनी पारंपरिक ‘पिंगळा’ कला पुन्हा जिवंत केली आणि “माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला” या गीताने वातावरण भारावून टाकले.या प्रसंगी स्वागतपर भाषणात संस्था अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी सांगितले की, “हा महोत्सव केवळ एका संस्थेचा नसून संपूर्ण विद्यापीठ परिवाराचा आहे. प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आणि संस्थाचालक यांनी एकत्रितपणे सहभाग नोंदविल्यास हा खरा आदर्श महोत्सव ठरेल.”
कुलगुरूंनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हंटले की, “युवा महोत्सव म्हणजे विद्यापीठातील विविध संस्कृतींचा संगम आहे. अशा मंचांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभेला वाव मिळतो, संघभावना आणि संस्कार यांचा विकास होतो.”ही स्पर्धा पारदर्शक पद्धतीने घेतली जाते. जिंकणारेच नव्हे तर भाग घेणारेही खरे विजेते आहेत. पूरस्थितीमुळे आलेल्या अडचणींवर मात करून युवा महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या सांगोला महाविद्यालयाचे त्यांनी विशेष कौतुक केले. “हा आपला स्वतःचा कार्यक्रम आहे, थोडीफार उणीव झाली तरी ती आपलीच आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच त्यांनी आयोजन समितीचे अभिनंदन करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.युवा महोत्सव उदघाटन सोहळयापूर्वी सांगोला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पूरग्रस्तासाठी मदत निधी संकलन केंद्राचे उदघाटन मा.कुलगुरु महोदयांच्याहस्ते संपन्न झाले. तसेच कार्यक्रमाच्या मुख्य रंगमंचावर पुरामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यासाठी भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. या चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला, साहित्य, वाद्य, काव्यवाचन, पोस्टर प्रस्तुती, आणि लोककला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ५३ महाविद्यालयांमधील १५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत, सांगोला महाविद्यालयाच्या परिसरात कलात्मकता आणि सृजनशीलतेचा उत्सव फुलला आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. लक्ष्मीकांत दामा (प्र.कुलगुरू), डॉ. अतुल लकडे (प्र-कुलसचिव, विद्यापीठ) डॉ. केदारनाथ काळवणे (संचालक, विद्यार्थी विकास विभाग) संस्थेचे अध्यक्ष मा. बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष प्रा. पी. सी. झपके, सचिव मा. उदय (बापू) घोंगडे, सहसचिव मा. साहेबराव ढेकळे, मा. विश्वनाथ चव्हाण, माजी सचिव झिरपे सर, रावसाहेब ताठे, शामराव लांडगे, सुरेश फुले, सुधीर उकळे, चंद्रशेखर अंकलगी, दिनानाथ लोखंडे तसेच संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, समन्वयक डॉ. रामचंद्र पवार, सहसमन्वयक डॉ. राजकुमार ताठे व प्रा. संतोष लोंढे, यावेळी विविध स्पर्धांचे परीक्षक, विद्यापीठ परीक्षेत्रातील सहभागी महाविद्यालयांचे संघनायक व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
उदघाटऩ सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.कॅप्टन संतोष कांबळे यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. केदारनाथ काळवणे (संचालक, विद्यार्थी विकास विभाग) यांनी केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी आभारप्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशासाठी संपूर्ण शिक्षकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी व स्वयंसेवक कार्यरत असून परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने सांगोला शहरात सणासारखा उत्साह पाहायला मिळत आहे.



