खेळ

वैभव सूर्यवंशी : भारतीय क्रिकेटचे भविष्य

वैभव सूर्यवंशी : भारतीय क्रिकेटचे भविष्य 

श्याम ठाणेदार/दौंड

आयपीएल म्हणजे रत्नांची खाण असे म्हंटले जाते कारण दरवर्षी आयपीएलमध्ये असे रत्न उदयास येते की ज्या रत्नाने संपूर्ण क्रिकेट विश्वच उजळून निघते. अशाच एका उगवत्या रत्नाने केवळ भारतीय क्रिकेटच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगत उजळून निघाले आहे आणि हे क्रिकेट रत्न आहे अवघ्या १५ वर्षाचं आणि त्याचे नाव आहे वैभव सूर्यवंशी. सध्या आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशी या १५ वर्षाच्या मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे अर्थात त्याने तसा कारनामाच करून दाखवला आहे. मूळचा बिहार राज्यातील असलेला वैभव सूर्यवंशी हा अवघ्या १५ वर्षाचा युवा खेळाडू आहे. मागील वर्षी ज्यावेळी राजस्थान रॉयल्स संघाने त्याच्यावर १ कोटी १० लाखांची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतले त्याचवेळी त्याची चर्चा सुरू झाली. राजस्थान रॉयल्स संघाने या १४ वर्षाच्या मुलावर इतकी मोठी बोली का लावली असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात विचारला गेला त्याचे उत्तर शोधण्यासाठी थोडे मागे जावे लागेल. वैभव सूर्यवंशीने १२ व्या वर्षीच बिहारकडून १९ वर्षाखालील संघातून विणू माकड चषक क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला तिथे त्याने चांगली कामगिरी केल्याने त्याची निवड बिहारच्या रणजी संघात करण्यात आली. बिहार कडून रणजी खेळणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. १३ व्या वर्षी वैभवने विजय हजारे चषकात धावांचा रतीब घातला त्यामुळे त्याची भारताच्या १९ वर्षाखालील ब संघात निवड झाली. ४ संघाने भाग घेतलेल्या या स्पर्धेत त्याने ६ डावात १७७ धावा काढल्या. त्यात त्याने दोन अर्धशतके झळकावली त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या १९ वर्षाखालील मुख्य संघात त्याची निवड झाली. १९ वर्षाखालील कसोटीतील पदार्पणाच्या सामन्यात त्याने अवघ्या ५८ चेंडूत तडाखेबंद शतक झळकावले त्यावेळी त्याचे वय १३ वर्ष होते. १९ वर्षाखालील आशिया कप स्पर्धेत तर त्याने धुमाकुळ घातला. तिथे यूएई विरुद्ध त्याने ४६ चेंडूत ७६ धावा काढल्या तर उपान्त्य फेरीत श्रीलंकेविरुद्ध ३६ चेंडूत ६७ धावा काढल्या. या स्पर्धेपासून त्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. ही चर्चा राजस्थान रॉयल्स संघाच्या पदाधिकाऱ्यांना समजली. त्यांनी त्यांचा बॅटिंग कोच असलेल्या विक्रम राठोडला वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहण्यास सांगितले. विक्रम राठोड यांनी वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहिली आणि त्याला आपल्या संघात घेण्याचे निश्चित केले. त्यांचा मुख्य कोच असलेला राहुल द्रविड हा तर नवोदित खेळाडूंना संधी देण्यास प्रसिद्ध आहे. त्याने देखील वैभवची फलंदाजी पाहिली आणि त्याला संधी देण्याचे ठरवले आणि अशाप्रकारे त्याची राजस्थान रॉयल्स संघात एन्ट्री झाली. आयपीएल सुरू झाली पण सुरुवातीच्या काही सामन्यात वैभवला संधी मिळाली नाही. लखनौ संघाविरुद्ध राजस्थान रॉयल्सने त्याला पहिल्यांदा संधी दिली. वैभव याच संधीची वाट पाहत होता. त्याने या संधीचे सोने करण्याचे ठरवले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूर सारख्या अनुभवी गोलंदाजाला पुढे सरसावत षटकार खेचला आणि सर्वांना चकित केले. या सामन्यात त्याने २० चेंडूत ३४ धावा काढून आपल्या आयपीएल कारकिर्दीची धडाकेबाज सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यातही त्याने चांगली कामगिरी केली. गुजरात विरुद्धच्या सामन्यात तर त्याने कमाल करत अवघ्या ३८ चेंडूत १०१ धावा काढत क्रिकेट विश्वाला चकित केले. या शतकासोबत त्याने अनेक विक्रमाला गवसणी घातली. तो आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयाचा शतकवीर ठरला. इतकेच नाही तर सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा भारतीय खेळाडू ठरला. केवळ आयपीएलच नाही तर टी २० क्रिकेट इतिहासात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. त्याने अवघ्या ३६ चेंडूत शतक झळकावत युसुफ पठाणचा विक्रम मोडला. एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला. मागील वर्षी आयपीएल गाजवलेल्या वैभवने यावर्षी तर कमाल करत अनेक विक्रम आपल्या नावे केले. यावर्षीही त्याने ३६ चेंडूत शतक झळकावत इतिहास घडवला. आयपीएलमध्ये दोन शतके आणि दोन्हीही ३६ चेंडूत झळकावणारा तो एकमेव खेळाडू ठरला. वयाच्या १५ वर्षी आयपीएलमध्ये दोन शतके झळकावणाराही तो एकमेव खेळाडू आहे. केवळ आयपीएलमध्येच नाही तर मागील वर्षी झालेल्या १९ वर्षाखालील टी २० स्पर्धेतही त्याने शानदार कामगिरी केली. त्यांच्या शानदार कामगिरीने भारताने तो विश्वचषक आपल्या नावावर केला होता. आयपीएल असो की राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कोणत्याही स्पर्धेत तो जितक्या निर्भीडपणे खेळतो तितक्या निर्भीडपणे खेळणारे खूप कमी खेळाडू क्रिकेट विश्वात आहे. जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, रशीद खान, जोश हेजलवूड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स यासारख्या जगातील दिग्गज गोलंदाजांना तो ज्या प्रकारे षटकार खेचतो ते पाहून अचंबित होते. अवघ्या १५ वर्षाच्या या खेळाडूच्या प्रेमात अवघे क्रिकेट विश्व पडले आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, पॅट कमिन्स, ॲडम गिलख्रिस्ट, वासिम अक्रम, सुनील गावसकर, श्रीकांत, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, नवज्योत सिंग सिद्धू, हरभजन सिंग, महेंद्र सिंग धोनी यासारख्या महान खेळाडूंनी त्याचे कौतुक केले आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर तर त्याच्या प्रेमातच पडला आहे. सचिन तेंडूलकरने वैभवच्या खेळाविषयी ट्विट केले की, वैभवची निडर शैली, उत्कृष्ट बॅट स्पीड, चेंडूची लांबी पटकन ओळखण्याची क्षमता आणि चेंडूच्या मागे ताकद लावण्याची तयारी या सर्वांचा संगम म्हणजे वैभवची धमाकेदार खेळी. केवळ सचिन तेंडुलकरच नव्हे तर जगातील अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्या कौतुकाचे इमले बांधले आहेत. केवळ खेळाडूच नव्हे तर क्रिकेट प्रेमीनींही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. क्रिकेट प्रेमींनी त्याच्या खेळीचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मिडिया तर त्याच्यावर फिदाच झाली आहे. त्याच्या खेळाने त्याने आपण भारतीय क्रिकेटचे भविष्य आहोत हे दाखवून दिले आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे त्याने लहान वयातच आपण कोण होणार हे दाखवून दिले आहे. त्याच्या या लाजवाब फलंदाजीने त्याच्यावर प्रसिद्धीचा झोत आला आहे. वैभवने मात्र या झगमगाटाकडे दुर्लक्ष करून खेळावर लक्ष केंद्रित करायला हवे. त्याला आणखी यशोशिखरे गाठायची असेल तर त्याने झगमगाटापासून दूर राहिलेलेच बरे. प्रसिद्धीच्या झगमगाटात वाहत जाऊन आपल्या करिअरचे मातेरे करणारे अनेक खेळाडू आपण पाहिले आहेत. विनोद कांबळी, पृथ्वी शॉ ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. वैभवने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करून आणखी मेहनत केल्यास तो भारतीय क्रिकेटचे भविष्य ठरेल यात शंका नाही. वैभवला खूप खूप शुभेच्छा!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button