स्वस्थ नारी म्हणजे सशक्त परिवाराची पायाभरणी
" स्त्री म्हणून जगतांना खुप काही करावं लागतं , आयुष्य तिचे असते पण दुसऱ्यासाठी जगावं लागतं”

स्वस्थ नारी म्हणजे सशक्त परिवाराची पायाभरणी
” स्त्री म्हणून जगतांना खुप काही करावं लागतं
आयुष्य तिचे असते पण दुसऱ्यासाठी जगावं लागतं”
समाजाच्या आरोग्याचा व देशाच्या विकासाचा पाया म्हणजे स्त्रीचे आरोग्य. कारण नारी हीच एका परिवाराची, समाजाची आणि अखेर राष्ट्राची मूळ शक्ती आहे. “स्त्री निरोगी असेल तरच घर आनंदी असते आणि घर आनंदी असेल तरच समाज सक्षम होतो.” हा विचार आपण मान्य केला, तर ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ हे फक्त घोषवाक्य न राहता भारताची दिशा दाखविणारा विचार आहे व हाच विचार भविष्यातील प्रत्यक्ष आयुष्याचा मंत्र ठरेल. कारण स्त्री निरोगी असेल तर तिच्या मुलांचे आरोग्य चांगले राहते; घरातील इतर सदस्यांवरही तिचा सकारात्मक परिणाम होतो. परिवारातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य हे आईच्या आरोग्यावर अवलंबून असते. जर आई निरोगी असेल तर तिचे मूलही निरोगी वाढते. स्त्रीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता तिला नियमित वैद्यकीय तपासणी, मानसिक शांती आणि कुटुंबाकडून आधार मिळाले तर संपूर्ण कुटुंब सक्षम, निरोगी आणि आनंदी राहते. म्हणूनच स्वस्थ नारी हीच सशक्त परिवाराची खरी गुरुकिल्ली आहे. सामाजिक पातळीवर मानसिकता बदलणे, महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
आज स्त्रिया शिक्षण, उद्योग, नोकरी, राजकारण या क्षेत्रांत झेपावत असल्या तरी त्यांच्या आरोग्याकडे अजूनही दुर्लक्ष केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातील निम्म्याहून अधिक स्त्रिया रक्ताल्पतेने ग्रस्त आहेत. प्रसूतीदरम्यान योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्याने मातामृत्यू दरही चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये रक्ताल्पता, कुपोषण, प्रसूतीसंबंधी आजार अजूनही चिंतेचा विषय आहेत. शहरी भागात मात्र मधुमेह, स्थूलता, हृदयविकार यांसारखे जीवनशैलीशी निगडीत आजार वाढत आहेत. घरातील जबाबदाऱ्या, नोकरीतील ताण, समाजाच्या अपेक्षा या सगळ्यामुळे स्त्रीच्या आरोग्याकडे सर्वात शेवटी लक्ष दिले जाते. पण आकडेवारीच्या पलीकडे एक वेगळीच गोष्ट आहे. घरातील स्त्री जर आजारी पडली, तर घरातील वातावरणच बदलून जाते. मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू हरवते, वृद्धांना आधार उरत नाही आणि पुरुष अस्वस्थ होतो. कारण नारी ही घराचे हृदय आहे. तिच्या हसण्यात कुटुंबाचे सौख्य दडलेले असते, तर तिच्या थकलेल्या नजरेत घराचे दुःख उमटते.
आज सरकार विविध आरोग्य योजना राबवत आहे, जसे प्रसूतीसाठी मोफत वैद्यकीय सेवा, पोषण आहार योजना, महिलांसाठी योग शिबिरे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृह सुविधा पण केवळ सरकारी पातळीवर काम करून चालणार नाही. प्रत्येक परिवाराने, समाजाने, कुटुंबाने जागरूक होणे गरजेचे आहे. तसेच, आजच्या आधुनिक समाजात महिला शिक्षण, रोजगार, राजकारण, उद्योग या क्षेत्रात वेगाने प्रगती करत असल्या तरी आरोग्याच्या बाबतीत अजूनही मोठ्या अडचणी दिसून येतात. घरातील प्रत्येकाने हे लक्षात ठेवावे की, मुलींच्या आहाराची काळजी घेणे, किशोरवयीन मुलींना योग्य आरोग्य व स्वच्छतेचे शिक्षण देणे, स्त्रियांना नियमित आरोग्य तपासणीस प्रवृत्त करणे, घरकामात पुरुषांनी समतोल सहभाग वाढवणे आणि मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने संवाद साधने. या बाबी महिला आरोग्यासाठी महत्त्वाच्या ठरतात आणि या गोष्टींचा अवलंब झाला तरच ‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ हा विचार प्रत्यक्षात उतरू शकेल. त्यासाठी कटिबध्द राहणे गरजेचे आहे, तेव्हाच हे शक्य होईल.
आज आपल्याला हे मान्य करावे लागेल की स्त्री ही फक्त घर चालवणारी नाही, तीच घर घडवणारी आहे. तिचे आरोग्य बळकट असेल तर कुटुंब आनंदी राहील आणि आनंदी कुटुंबातूनच सक्षम राष्ट्र उभे राहते. स्त्री निरोगी असेल तरच कुटुंब सशक्त होईल आणि राष्ट्र अधिक प्रगत होईल. म्हणूनच, प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात करून स्त्रीच्या आरोग्याचे आणि सन्मानाचे रक्षण करणे हिच आजची खरी सामाजिक जबाबदारी आहे. शेवटी, निरोगी स्त्री, निरोगी पिढी, आनंदी घर म्हणजे सशक्त समाज आणि सशक्त समाज म्हणजे सक्षम राष्ट्र.
स्त्री पुरुष दोघंही समान आहेत आणि सुख मिळविण्यासाठी धडपडणं हा दोघांचाही अधिकार आहे. फक्त पुरुषांना आयुष्यभर सुखात राहावं आणि दु:खाची विभागणी संपली पाहिजे. माणूस या नात्यानं पुरुषाला मिळतं ते जन्मसिध्द स्वातंत्र्य स्त्रीलाही मिळालं पाहिजे. ही स्त्री भूतकाळाशी जोडलेली असते, भावूक आणि हळवी असते. कुटुंबाचा सांभाळ करते, स्वत:ला निराधार वाटत असतांनाही कुटुंबाला आधार देते, पती, मुलगी, मुलगा यांच्यावर प्रेम करते. कधी त्यांचा दुरावा जाणवल्यावर येणारी विफलताही अनुभवते, ती व्यवसायात ही कर्तव्यदक्ष असते. एकंदरीत तिचा सहभाग महत्वाचा हे विसरुन चालणार नाही. चूल आणि मूल मध्ये गुरुफटलेल्या, चालीरितीच्या कुंपणात वावरणाऱ्या स्त्रीला समाजभय संकोच यामध्ये पार दडपून टाकलेलं, पण काळाच्या ओघात परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. या सबबीनंतर तिने टोकाचे पाऊल उचलून भरारी घेण्याचं ठरवलं. कुटुंबाबरोबरच समाजाच्या उभारणीतही मोलाची भूमीका बजावत आहे, अशा या सशक्त नारीला मानाचा मुजरा !

