आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत सिंहगड ठरला उपविजेता

सोलापूर :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावून दमदार ठसा उमटविला आहे. स्पर्धा 22 सप्टेंबर रोजी बार्शी येथील कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी येथे पार पडल्या.या स्पर्धेत विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांमधील निवडक संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक संघाने उपांत्य फेरी व अंतिम फेरीत चुरशीचे सामने खेळले. यामध्ये सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी एकजुटीने व जिद्दीच्या जोरावर अंतिम क्षणापर्यंत झुंज देत उपविजेतेपद आपल्या नावावर केले.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पियुष पवार, प्रश्मित बुगड, आदित्य सातपुते आणि अब्दुल बेद्रे या खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान कौशल्यपूर्ण खेळ करून प्रेक्षकांची दाद मिळवली. दमदार सर्व्हिस, जलद रिटर्न आणि तंत्रशुद्ध खेळामुळे संघाने उपविजेतेपद पटकावले.संघाला क्रीडा समन्वयक प्रा. करीम मुजावर यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि प्रत्येक खेळाडूने संघभावनेतून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.
या यशाबद्दल कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. आर. टी. व्यवहारे आणि प्रा. करीम मुजावर यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. पुढील वाटचालीसाठी खेळाडूंना शुभेच्छा देताना त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तरीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतही यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सोमवार, दि. 29 सप्टेंबर रोजी कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या हस्ते मुख्य सोसायटी ऑफिसमध्ये सत्कारकरण्यात आला.



