पंढरपूर : नदीकाठच्या शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित; शेतकरी अडचणीत, तातडीने पूर्ववत करण्याची मागणी

पंढरपूर : नदीकाठच्या शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित; शेतकरी अडचणीत, तातडीने पूर्ववत करण्याची मागणी
पंढरपूर/ संतोष मोरे
पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या शेती पंपांचा वीज पुरवठा सध्या कपात करण्यात आल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ऐन उन्हाळ्यात पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे उस, मका तसेच भाजीपाला पिके वाळण्याच्या मार्गावर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पंढरपूर विभागाकडे निवेदन देण्यात आले आहे. वाढलेले उत्पादन खर्च, अनियमित हवामान आणि बाजारातील चढ-उतार यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर वीज कपातीमुळे आणखी आर्थिक भार पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नदीकाठच्या भागात मोठ्या प्रमाणात नगदी पिकांचे उत्पादन घेतले जात असल्याने नियमित वीज पुरवठा अत्यावश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेती पंपांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत सुरू करावा, तसेच उन्हाळ्यात नियोजित व अखंड वीज पुरवठा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी वाखरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य संतोष काका बागल, तानाजी बागल, सचिन पाटील, सचिन आटकळे,शेखर आटकळे,माऊली आटकळे,शंकर शिंदे, महेश गायकवाड इत्यादी उपस्थित होते


